जिद्दी महिलांच्या कष्टावरच घराचं घरपण टिकून आहे

शेतीचा शोध लावण्यापासून ते व्यसनी नवऱ्याच्या तावडीतून शेती वाचवण्याचे
कसब स्त्रीलाच अवगत आहे. तीला माहिती आहे की एकर दोन एकर हक्काची शेती
असेल तर त्यात पडेल ते कष्ट ऊपसून एका दाण्याचे हजार दाणे काढता येतात.
शिवारात शेत अन् गावात घर झाले की त्या माऊलीला कशाची चिंता सतावत नसते.
पण रेणापूर या तालुक्या पासून अवघ्या आठ – दहा किलोमीटरवरचे रेणा साखर
कारखाण्या लगतचे सिंदगाव हे गाव. गावाचा शिवार तसा सर्व साधारण. पण महानंदा
काशीगीर गीरी यांचा नवरा गावात पीठ मागून आणून व्यसनी लोकात राहून वाया
गेला. त्याने पोटच्या पोराला मागे काय राहिल, मुलींना कोण उजवेल याची कधी चिंता
केली नाही. दारूच्या व्यसनापाई भरमसाठ कर्ज केले. शेती दुसऱ्याच्या ताब्यात गेली.
काही जाब विचारला की बायकोला ढोरागत मारीत. महानंदाचे माहेर गावातच असल्याने
भाऊ मधी पडला. व्यसनी काशीगीरच्या मृत्यूनंतर पदरात लहान मुलगा, दोन मुली.
रहायचें घर म्हणजे चार पत्र्याचे कुड लावून केलेला आडोसा. पूर्वीही दुसऱ्याच्या शेतात
मजूरीनं जाऊन संसाराची ठीगळं जोडणारी. एक झाले जाच कमी झाला. कमावेल ते
पोटात जाऊ लागले. भावाने मध्यस्थी करून व्याज कमी करून पैसे भरून चार एकर
शेत सोडवून दिले. अन् ते २०१४ ला महानंदाच्या नावे केले. त्यात त्यांनी जीव ओतून
कामे करायला सुरूवात केली. मुलाचं, मुलीची लग्ने झाली. शेतात कृषि विभागाकडून
शेततळे घेतले. बोअर पाडला. २० चिकुची झाडं, केशर आंब्याची ४० झाडे लावली. म्हैस
घेतली. दूधावर घर चालले. १२ वी झालेला मुलगा कैलास दिवसरात्र बायको, आईसह
शेतात राबतो. दिड एकर ऊस लावला. एक एकरवर तुती लागवड केली. शेड बांधले.

पहिले वर्षी घरच्यानी केलेल्या मेहनतीमुळे चाळीसेक हजाराचे उत्पन्न निघाले. आता
दुसऱ्या वेळेस अळ्या सोडल्यात, त्यांना पाला खाऊ घालणे, वगैरे कामे महानंदाताई
करतात. म्हशीची वगार मोठी झाल्यावर ती विकुन बोअरला मोटार बसवली. बचतीतून
पाईपलाईन केली. अनुसूचित जमाती, भटके अशांना गावाबाहेर ग्रामपंचायतीने प्लॉट
दिले. तिथे परवा पत्र्याचे छोटेरवासी घर बांधले.
शेतात महानंदाताई वीस गुंठ्यावर भाजीपाला लावून गावात विकतात. सोयाबीन,
तूर, गहू, हरभरा, ऊस, यापासून वर्षाला दिड दोन लाखाचे उत्पन्न मिळू लागले.
कैलासने मुलं लातूरात शिकायला ठेवली. चार एकर वर घरदार राबून, एकही मजूर न
लावता, दुसऱ्याकडून नांगरून, पेरूण घेतात. स्वत:चे हक्काचे शेत झाल्यावर राबण्यात,
कष्ट करण्यात एक समाधान मिळते. ते समाधान आज पुन्हा महानंदाताईच्या
वाटयाला आले. ते केवळ शेतीत कुटूंबासह राबून शेती पिकवल्याने त्या मुलगा, सुनेला,
नातवांना पुढील आयुष्यात चांगले दिवस मिळवून देऊ शकल्या. खंबीरपणे, पाय होवून
उभ्या राहिल्याने गेलेले शेत परत मिळवून समाधानाने जगतांना त्यानी इतरांपुढे आदर्श
निर्माण करून दिला. एक काळ असा होता की, दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करूनही
दोन वेळेचे पोट भरत नव्हते. नवऱ्याच्या त्रासाने खंगुन गेल्या होत्या. एकदोनदा तर
आत्महत्येचाही त्यांनी प्रयत्न केलेला पण मुलांकडे पाहून त्यांनी सावरून नवीन आयुष्य
घडवले म्हणून त्या आज समाधानी आहेत.
आम्ही चौघी :-
याच गावातल्या कोळी समाजाला भुमिहीन महिला व इतर चार भगीनी दुसऱ्यांच्या
शेतावर रोजगार करून पै पैसा बचत करून स्वयं शिक्षण संस्थेच्या मेघा आकनगिरे
यांच्या सांगण्यावरून “आम्ही चौघी अनुसया माता बचत गट” स्थापन केला. शेजारच्या
पोहरेगावातील महाराष्ट्र बँकेत बचत खाते उघडले. प्रत्येकीने दरमहा ३०० रु. जमा
करायला सुरू केले. जमलेल्या पैशातून गटाला चाळीस हजाराचे कर्ज मिळाले. त्यातून
अगोदर म्हैस घेतली. दहा जणी मधून अनिता व सुनिता भालेराव याजावा तर मुक्ता
जगताप, चंद्रकला ढवळे अशा चौघींनी गटाकडून मिळालेल्या दोन लाख कर्जातून
प्रत्येकीला वीस हजार आले. त्यातून रेणापूरच्या आठवडी बाजारातून लहान शेळयांची
पिल्लं घेतली. ती रोजंदारीवर गेल्यावर गवत, पाला टाकून वाढवले. गाभण गेल्यावर
विकून जास्त पैसे आले. पुन्हा लहान चार पिलं घेतली. पुढे वाढवत वाढवत दर पंधरा
दिवसात नवऱ्याच्या मदतीने बाजारातून प्रत्येकी दोन तीन पिल्लं आणायची, पहिले
विकायची अशी करीत व्यवसाय वाढवला. प्रत्येकीनं लहान म्हशी पासून शेळया, गाई
घेतल्या. दूध, दही, तूपाचा व्यवसाय वाढवला. त्यावर घर खर्च भागू लागला.
रोजंदारीची पैसे व शेळयाच्या विक्रीतून शिल्लक भांडवल वाढत गेले.
अनिताचा नवरा शिवराम बटईनं शेती करतो. तर सुनिताचा नवरा लक्ष्मण
सालगडी म्हणून नोकरीला आहे. मुक्ता व चंद्रकलेची नवरे ट्रक ड्रायव्हर म्हणून नोकरी
करतात. त्यांच्या मिळकतीचे पैसे मुलांची शिक्षण व इतर खर्चाला वापरतात. आज
चौघीजणीने मिळून हा व्यवसाय सुरू केला. त्यापूर्वी केंव्हा तरी लागणाऱ्या निव्वळ
मजूरीच्या शंभरेकर रूपयावर समाधान मानावे लागत. नूस्ती चणचण भासत. घरात
एवढया तेवढया वरून भांडणं होत. मुलांच्या दवाखान्याला शेकडा दहा पंधरा टक्क्यानी
कर्ज काढावे लागायचे. पून्हा व्याज फेडण्यातच हैराण. मागे काहीच शिल्लक रहात
नसायचे. पुन्हा नवरा बायकोचे भांडणं. हे दुष्टचक्र स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या
मार्गदर्शनाने गटानं गेल्याने भेदले गेले. आज वर्षाला प्रत्येकीच्या हिश्याला शेळयांच्या
विक्रीतून पन्नास साठ हजाराचा नफा शिल्लक रहिला आहे. मुलं चांगल्या शाळेत
घातलीत. घरावर छप्पर होते. तिथं आता पत्रे घातली. खाण्यात भाज्या आल्या.
प्रत्येकीच्या घरातले वातावरण आनंदाचे निर्माण झाले. त्याला मुळ कारण पैशाची
चणचण. बकरी ईद, रमजान, मोहरम ला बकरे आणून विकली. त्यातून पाच पाच
हजार सुटले. आठवडयास एक दिवस गावात मटन खाणाऱ्यासाठी बकरे कापून विक्री
केली जाते. त्यासाठी अनिताचा नवरा शिवरामची मोलाची मदत होते. जर गटाबाबत
कळले नसते, एकएकटया मजूरी मिळेल तसी रोजंदारी करीत राहिले असतो तर
वाढत्या खर्चाची तोंड मिळवणी करण्यातच बेजार झालो असतो असे त्या चौघीही
आत्मविश्वासाने सांगतांना त्यांच्या बोलण्यातून एक प्रकारचा आत्मविश्वास दिसत
होता. प्रत्येकीत आपण एकीने काही तरी केले तर पुढे पडू हे दिसत होते. प्रत्येक बाब
सांगण्यासाठी त्या उत्सुक होत्या. हातात चार पैसे आले की ते कसे धंदयात गुंतवायचे,
त्यातून नफा कसा कमावायचा हा गुरूमंत्र त्यांना शेळया व म्हशीच्या धंदयातून
मिळाला. गटातल्या इतर सहाजणीही किराणा दुकान, शिलाई मशीन, दुध विक्री,
दुसऱ्याचे शेत बटईने करणे अशा बाबीत पैसे गुंतवून चार पैसे अधिकचे कमावत
आहेत. हा आत्मविश्वास, महिलांना एकत्र येऊन मिटींगला जाणे. जमलेले पैसे बँकेत
भरणे, बँकेचा व्यवहार, घरच्या मुलांच्या शिक्षणास, त्यांच्या वह्या पुस्तकं, ड्रेस साठी
खर्च करण्यासाठी नवऱ्यापुढं हात पसरावा लागत नाही. प्रत्येकीच्या हातात मोबाईल
आला, ते हाताळण्याचे, नवख्या पुरूषाला बोलायचे धाडस येते कुठून हे गटाने दिले हे
सांगायची गरज राहत नाही. त्या आता स्वत: निर्णय घेऊ लागल्यात. पूर्वी त्या
घराबाहेर लग्न कार्यासाठी तेवढे जात. आज त्या वेगवेगळया मिटींग, चर्चासत्र,
शिबिरासाठी मिळून जातात. एकमेकींचे विचार ऐकतात. कोण कशा पध्दतीने व्यवसाय
करते, ती बोलते कशी, पुढे कशी पडली हा अनुभव घरात बसून आला नसता. हाती
चार पैसे आले की, घरचेही त्यांना स्वातंत्र्य देतात. निर्णय प्रक्रियेत सामील करून
घेतात. घरातील भांडणतंटे कमी होऊन चार चौघी सारखे आनंदाने जगता येते हे
गटामुळे, “स्वयं शिक्षणात सहभागी झाल्याने हे घडू शकले, हे प्रत्येकीच्या बोलण्यातून
येत होते. हेच तर महिला सक्षमीकरणाचे पुढचे पाऊल म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
स्त्रीलाही आता तीची बलस्थाने समजू लागलीत. पूर्वी पुरूष स्त्रीला नगण्य समजत.
पण या आधुनिक युगात दोघानीही संसाराचा गाडा रेटल्याशिवाय तो पुढे जाऊ शकणार
नाही. ती जाणीव झाल्यामुळे असेल कदाचीत. सध्याच्या युगात अशी अशिक्षीत गरीब
पुरूषही तिला तिचा स्पेस देताहेत ही स्वागतार्ह बाब आहे. व्यवसाय कंवढाका असेना
त्यात मनलावून काम केल्यास यश हे आपल्या हातात असते हे सिंदगावच्या दुर्लक्षीत
समाजातील या महिलांनी करून दाखवले हे मला खूप मोलाचे वाटते.

महिला संपर्क
१) अनिता भालेराव – ८७७५३७३८३२
२) मुक्ता जगताप – ८९७५९९१८५३
३) चंद्रकला ढवळे – ९८९०८०९२१०

रमेश चिल्ले
लेखक जेष्ठ साहित्यिक असून
शेती व पर्यावरणाचे अभ्यासक
आहेत.
मो. नं. ७५०७५५०१०२
Email : rameshchille@biogreenagri.com